प्रवास असतोच निराळा, रंगीत आठवणींनी भरलेला सारा,
मित्र बनतात, धमाल होते, असतो तो काळ सदैव स्मरणारा,
हे सगळं मनात साठवून, सावरून मौल्यवान क्षणांचा पसारा,
सामान घेऊन परत येण्यात पार दमछाक होऊन जाते,
सरते शेवटी काही प्रवासांमध्ये, फक्त तिकीट राहून जाते.
प्रवास केला, दिसले मित्र, अत्यानंद गगनात मावेना सारा,
जसा पावसाने तृप्त झालेल्या धरिणीच्या सुगंधाचा पसारा,
तसा पाऊस पुन्हा पडेल का, ह्याचा अभ्यास हा सारा,
प्रेमापेक्षा जास्त गडद आणि कडक छाप मैत्रीची असते,
काही संवाद, भेटी विरतात हवेत, फक्त तिकीट राहून जाते.
बघ गाफील असतानाच नेमके कसे वाजवतो नशीब बारा,
सोबतींची किंमत जेव्हा कळते, वेळ निघालेला असतो सारा,
अर्ध्याच रस्त्यात साईकलीची चैन तुटल्यागत होतो हाल सारा,
किती नुकसान झालं, काय गमावलं हे वेळ गेल्यावरच कळते,
निरव शांतता, निस्सीम पोकळ आणि फक्त तिकीट राहून जाते.
एका विशिष्ट ऋतूमध्ये चहूकडे असतो वाळलेल्या पानांचा पसारा,
सूर्य अस्ताला गेल्यावर नित्य होतो प्रकार सावली हरवणारा,
किती प्रकारे आपल्याला सांगतो निसर्ग घटनाक्रम हा सारा,
पण फुकटचे ते फालतूचे असे मनाचे विचित्र धोरण असते,
लोकं हरवतात, कडा ओलावतात, फक्त तिकीट राहून जाते.
मैफिल रंगात असेन, चंद्र सूर्य येतील, पण नसेल तो तारा,
अमाप संपत्ती, पण तो एकच सल उभा कंगाल करणारा,
रागवा, भांडा पण वेळ असतानाच कळवा तो विषय सारा,
वाका, एक पाऊल मागे घ्या, संवाद साधून सांभाळा हे नाते,
आता तर आहे, पण नंतर मात्र फक्त तिकीट राहून जाते.
-ऋत्वीक