मायभूमीच्या नसानसांत स्पंदते मराठी,
सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात गर्जते मराठी
काळ्या मातीवर ओघळणारा घाम मराठी
टिळक-आंबेडकरांचा आवाज मराठी

गुढीची रेशमी आरास मराठी
चंदन-अष्टगंधाचा वास मराठी
पोळ्यातील सर्जाचा साज मराठी
पुरणपोळीचा घास मराठी

ढोल-ताश्याचा राग मराठी
टाळ-मृदंगाचा नाद मराठी
डफावरची थाप मराठी
आईची प्रेमळ हाक मराठी

भगव्या फेट्याचा मान मराठी
पैठणीच्या काठाची शान मराठी
काळ्या मातीची आन मराठी
हळदी कुंकवाचे वाण मराठी

रांझे-पाटलाचा चौरंग मराठी
अफझलखानाचा नाश मराठी
पोरक्या रयतेचा बाप मराठी
निधड्या छातीचा वाघ मराठी
-ऋत्वीक