“वर्दी चढवून निरोप घेतात लपवून ओल्या कडा,
रोज लढवैये निघतात जिंकण्या मानवतेचा लढा!”

त्यांच्या जवळपास हजर असण्याने कुणा न वाटे भेव,
सणावारी रविवारी बंदोबस्तात पाहिले मी वर्दीमधले देव.

रस्त्या-रस्त्यात, गल्ली बोळात, नुसते संक्रमणाचे भेव,
तरीपण आमच्या संरक्षणार्थ हजर आहेत वर्दीमधले देव.

रोगा विरुद्ध एक युद्ध आणि दुसरे निष्काळजी माणसांविरुद्ध,
mask, sanitizer व शस्त्रसज्ज लढतायत वर्दीमधले देव.

वीतभर पगारात संसार चालवून आपल्याला त्यांनी रक्षण दिले,
त्यांनाच दगडं मारतोय, गोळ्या मारतोय, काहीतरी लाज ठेव!

त्यांचे व परिवाराचे हाल पाहून चुकतो काळजाचा ठोका,
पगार कमी, सुविधा पण नाही, चला फोडू या प्रश्नांना पेव.

जीव धोक्यात टाकण्याची मला सांगा आहे तरी किंमत काय?
ज्याचे उतराई होणे अशक्य किंबहुना त्यालाच म्हणतात देव!

युद्धस्थितीत घर काय, जेवण काय आणि काय आराम?
नैवेद्य दाखवतो ना देवाला कधी त्याला पण म्हणूया जेव!
-ऋत्वीक