अपूर्व ह्या क्षणाला मनसोक्त जगून घ्यावे,
उद्याच्या चिंतेला क्षणभर विसरून जावे.

सोडून भीती, तोडून मनाचे बंध सारे,
एका अनोळखी वाटेवर भटकून यावे.

वाटेवर मनाच्या असेल विरोध कितीही,
प्रवाहाच्या विपरीत कधी पोहून बघावे.

दुःखाच्या वादळामध्ये खचून न जाता,
घेऊन आशेचा आसरा खंबीर असावे.

आयुष्याच्या धावपळीत धावता धावता,
ओंजळभर मोगरे सवडीने हुंगून पहावे.

छत्री-रेनकोट तर आवश्यक आहेच पण,
पावसात पहिल्या बिनधास्त भिजून घ्यावे.
-ऋत्वीक

Comments are closed.