आयुष्यातील सर्व संकटांशी जिद्दीने लढून घेशील,
पण पेलणार नाही ओझे तर मोकळं रडून घेशील.

उन्हाळे पावसाळे तू सारेच सोसले असशील,
अपमानाचे कडू घोट हसून प्यायले असशील,
दाखवून स्मित लपवून आसवे नि वेदना सारी,
वार हजार नियतीचे छातीवर झेलले असशील.

पण नित्याच्या त्या धावपळीत थोडं बसून घेशील,
अन पेलणार नाही ओझे तर मोकळं रडून घेशील.

मनापासून जपलेली स्वप्ने तुटून जातात कधी,
अति प्रिय असलेली व्यक्ती सोडून जातात कधी,
हृदयाजवळ ऐवज काही जपून ठेवतो आपण,
नजरेसमोरून अश्या वस्तू हरवून जातात कधी.

दुःखांचा पसारा हा सारा हवं तर लपवून घेशील,
पण रडावेसे वाटले कधी तर मोकळं रडून घेशील.

जास्त पाणी अडलं तर बांध फुटून जातो,
खूप जास्त ताणला तर दोरा तुटून जातो,
असेच काहीसे तुझ्या मनाचे देखील आहे,
एवढे वजन उचलताना तो गुदमरून जातो.

एकट्याने कधी तरी बसून मनाचे ऐकून घेशील,
आणि रडावेसे वाटलेच तर नक्की रडून घेशील.
-ऋत्वीक